वर्धा शहर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस, दोन महिला आरोपी अटकेत

Thu 25-Dec-2025,06:03 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : वर्धा पोलीस स्टेशन वर्धा शहर अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा यशस्वीरीत्या उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार रामप्रताप तिवारी (रा. गणेशनगर, वर्धा) हे काही कामानिमित्त नागपूर येथे दिनांक 09/12/2025 रोजी गेले होते. ते 15/12/2025 रोजी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 20,000 रुपयांचे घरगुती साहित्य चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव व श्रावण पवार हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, गिट्टी खदान, बोरगाव मेघे (वर्धा) येथील रहिवासी नंदिनी करण मेटकर (वय 21 वर्षे) व अर्चना आकाश देवकर (वय 24 वर्षे) यांनी ही चोरी केली आहे.

त्या माहितीच्या आधारे महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेत कसून चौकशी केली असता, त्यांनी गणेशनगर, वर्धा येथील घराचे कुलूप तोडून सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेला माल त्यांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींकडून 11,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक संतोष ताले (ठाणेदार, पोलीस स्टेशन वर्धा शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार तसेच महिला पोलीस अंमलदार जोशना परतेकी व विनिता कावलकर यांनी सहभाग घेतला.

आरोपींना न्यायालयात हजर करून एक दिवसाची पोलीस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी हे करीत आहेत.